Saturday, 7 May 2016

मनात, manaat, achyut godbole, marathi, manas shastra

Summary of the Book
अच्युत गोडबोले लिखित "मनात' हे मानसशास्त्रावरचं पुस्तक अलीकडंच प्रसिद्ध झालं. केवळ सात आठवड्यांत या पुस्तकाच्या सहा आवृत्त्या निघाल्या. शालेय वयात "मनाचे श्‍लोक' बहुधा प्रत्येकानंच वाचलेले असतात. गोडबोले यांनाही त्या मनाच्या श्‍लोकांनी मनाविषयी विचार करायला भाग पाडलेलं दिसतं. त्यानंतर पुढच्या आयुष्यभराच्या शालेय, महाविद्यालयीन, चळवळीच्या काळात आणि पुढं विविध महत्त्वाच्या जागतिक कंपन्यांमध्ये काम करतानासुद्धा या मनाच्या प्रकरणानं लेखकाला पछाडलेलं होतं असं दिसतं. व्यक्तिगत आणि सार्वजनिक आयुष्यातल्या अनेक प्रसंगांना तोंड देताना या "मन' नावाचं प्रकरण लेखकाच्या मध्ये येतच असे. साहित्य, कलेच्या प्रांतात मुशाफिरी करतानाही लेखकाला जागोजागी या "मनाच्या' दर्शनानं स्तिमित व्हायला व्हायचं. या आणि अशा अनेक गोष्टींनी लेखकाला मनात हे पुस्तक साकारण्याची प्रेरणा आणि बळ दिलेलं दिसतं. अर्थात हे पुस्तक जाणत्या पण सर्वसामान्य वाचकांना कळेल, अशा भाषेत समजवायचं या विचारानं जन्माला आलं. सर्वसामान्य माणसानं ठिकठिकाणी मनाविषयी ऐकलेल्या कथा, संकल्पना, शास्त्रज्ञांची नावं, त्यांचं जे कुतूहल चाळवलं जातं, त्याला शास्त्रीय ज्ञानाचा पाया या ग्रंथाच्या वाचनातून जरूर लाभतो.

मन म्हणजे काय, मनाचा शोध घेताना प्रचीन संस्कृतीपासून ते शास्त्रीय शोधांपर्यंत मनाचा प्रवास गोडबोले यांनी उलगडून दाखवला आहे. मनाचं गूढ उलगडताना सॉक्रेटिसपासून, ऍरिस्टॉटल, प्लेटो, बुद्ध ते एलिसपर्यंत - एका तत्त्वज्ञानापासून ते संशोधकापर्यंतचा आढावा या पुस्तकात आहे. सोपी, सुलभ, सुटसुटीत वाक्‍यरचना आणि सर्व प्रकारच्या वाचकांना कळेल अशी ओघवती, खुसखुशीत भाषा हे या पुस्तकाचं वैशिष्ट्य आहे. वाचायला सुरवात करताच वाचक त्यात पूर्ण बुडून जातो. पुस्तक हातावेगळं केल्याशिवाय त्याला चैन पडत नाही.यातल्या प्रकरणांची नावं वाचल्यावरच आपल्याला हव्या असलेल्या माहितीवर ज्ञानाची किल्ली सापडल्याचा आनंद होतो.

मन एक शोध, मेंदू : शोध आणि रचना, फ्रॉईडपर्यंतची वाटचाल, फ्रॉईड आणि युंग, एक्‍सपरिमेंटल सायकॉलॉजी, बिहेविअरिझम, गेस्टाल्ट सायकॉलॉजी, डेव्हलपमेंटल सायकॉलॉजी, सोशल सायकॉलॉजी, ह्युमॅनिस्टिक सायकॉलॉजी, बुद्धी, व्यक्तिमत्त्व, भावना-प्रेरणा, कॉग्निटिव्ह सायकॉलॉजी, पर्सेप्शन सायकॉलॉजी, तसंच मनोविकार आणि मानसोपचार अशा 17 भागांतून आणि जवळपास 600 पृष्ठांतून हा खजिना वाचकांसमोर गोडबोले यांनी रिता केला आहे. जवळपास 87 संदर्भग्रंथांच्या संदर्भानं "मनात' हा ग्रंथ समृद्ध झाला आहे. आपल्याला हव्या असलेल्या विशिष्ट संकल्पना किंवा शास्त्रज्ञांविषयी जाणून घेण्यासाठी नामसूचीही दिलेली आहे. सर्वसामान्य वाचकांच्या हाती हा ग्रंथ देताना या विविध विभागांची केवळ वरवरची आणि साधी सोपी माहिती न देता तिच्या मुळापर्यंत जाऊन त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न अतिशय गंभीरपणे, पण तरीही अत्यंत उत्कटतेनं लेखकानं केलेला जाणवल्याशिवाय राहत नाही.

अनेक पाश्‍चिमात्य तत्त्वज्ञ, शास्त्रज्ञ यांचा आधार घेतानाचा पौर्वात्य ज्ञानशाखा आणि तत्त्वज्ञान यांचाही सुरेख मेळ लेखकानं साधला आहे. गीतेच्या तत्त्वज्ञानाचा समर्पक संदर्भ देताना लेखकानं आनंदाची गुरुकिल्ली आपल्याला शोधून दिली आहे. लेखक म्हणतो त्याप्रमाणे एखाद्या उद्दिष्टापर्यंत पोचण्यासाठी आटोकाट प्रयत्न करताना मधल्या प्रवासातील, प्रक्रियेतील आनंदही तितक्‍याच उत्कटतेनं उपभोगला पाहिजे. अंतिम साध्य शेवटी लाभत नाही, तर ते प्रवासातल्या प्रत्येक टप्प्यात थोडं थोडं सापडत जातं. त्याचं "सेलिब्रेशन' करतच ही सफर पुढं चालली पाहिजे.

No comments:

Post a Comment