Monday, 18 April 2016

|| स्वामी || Language: मराठी Authors: रणजित देसाई Category: चरित्र, कथा, ऐतिहासिक, ललित, marathi kadambari, ranjit desai

"या तरुण पेशव्याचा अकाली मृत्यू म्हणजे मराठी साम्राज्याच्या जिव्हारी बसलेला घाव, त्यापुढे पानपतचा आघात काहीच नव्हे" -- ग्रॅंट डफ

"इतिहासाबद्दल सर्वांना प्रेम वाटते. ऐतिहासिक प्रसंगांमुळे, ऐकलेल्या कथांमुळे कांही व्यक्तींचा ठसा मनावर उमटतो; पण जेव्हा आपण एखादी विशिष्ट ऐतिहासिक व्यक्ती डोळ्यांसमोर ठेवून इतिहासाचे अवलोकन सूक्ष्मपणे करू लागतो, त्यावर चिंतन करू लागतो, तेव्हा कल्पना व सत्य यांतील अंतर जाणवू लागते. माधवरावांच्या कालखंडाचा अभ्यास करीत असता मला हे जाणवले. हा अभ्यास करण्यासाठी अनेक पुस्तकांची, बखरींची गरज लागते." -- रणजित देसाई

रणजित देसाई : मराठी साहित्याला समृद्ध करणारे थोर साहित्यिक. १९४६ साली 'भैरव' या कथेला लघुकथास्पर्धेत वाचकांकडून एकमुखाने पहिले पारितोषिक. १९५२मध्ये 'रुपमहाल' हा पहिला कथासंग्रह प्रकाशित. त्यानंतर सातत्याने कथालेखन. ग्रामीण जीवनावरील व ऐतिहासिक व्यक्तिरेखांवरील लेखन अधिक रसरशीत. 'स्वामी'ला साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त.
मराठीमध्ये अतिशय लोकप्रिय असलेली व रसिकमान्यता पावलेली रणजित देसाई यांची कादंबरी. थोरले माधवराव पेशवे यांचे राजकीय जीवन,कर्तृत्व आणि त्यांचे वैयक्तिक करुणगंभीर जीवन याचे अतिशय उदात्त व प्रभावी चित्रण स्वामीत केलेले आहे. इतिहास आणि साहित्य ह्याचे एवढे उर्जस्वल नि रोमहर्षक रसायन मराठी भाषेत आजतागायत कोणी निर्माण करू शकलेले नाही.
कादंबरीतील अतिशय उठावदार आणि कलात्मक व्यक्तिरेखा आहेत,माधवराव, रमाबाई आणि राघोबादादा यांच्या. सद्गुणी आणि तेजस्वी कर्तव्यदक्ष माधवराव,स्वार्थी,भोळसट,राजद्रोही राघोबा आणि सोशिक, त्यागी, साध्वी रमाबाई या तिन्ही चरित्ररेखा वाचकांच्या मनांवर विलक्षण परिणाम करतात. थोरल्या माधवराव पेशव्यांची ही चरित्रगंगा वाचताना करुणेने मन भरून येते. उदात्ततेने भारावून जाते आणि पूर्वजांच्या अभिमानाने मान ताठही होते. स्वामी वाचून वाचक दिपून जातो. दिग्मूढ होतो.
इतिहास आणि ललितकृती या दृष्टींनी रसोत्कट असलेली शोकात्मिक कादंबरी.

No comments:

Post a Comment